Multigrain Atta | मल्टीग्रेन भाकरी

Multigrain Atta | मल्टीग्रेन भाकरी

दिवसेंदिवस बैठे काम वाढत असल्यामुळे त्यानुसार आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे. बरेचदा आपला आहार हा एकाच प्रकारचा असतो. जसे कि ,दिवसातून दोन वेळा किँवा तीन वेळा गव्हाची चपाती खाणारे अनेक जण असतात. ज्यांना खूप शारीरिक श्रम आहेत , पचनशक्ती चांगली आहे , ज्यांचा भरपूर व्यायाम आहे. अशा लोकांसाठी गहू हितकारक आहे किंवा पचायला सोपा आहे . मात्र ज्यांची जीवनशैली बैठी आहेत, वजन जास्त आहे, वय 40 च्या पुढे आहे अशांनी गव्हा बरोबरच इतर धान्यांचा वापर करायला हवा.

सध्या मल्टी ग्रेन आटा खूप लोकप्रिय झालाय. भारतामध्ये पूर्वीपासूनच मल्टीग्रेन ही कॉन्सेप्ट वेगवेगळ्या प्रांतात वापरली जाते .
जशी आपली थालीपीठाची भाजणी ,चकलीची भाजणी धिरडी किंवा डोसे या पदार्थांमध्ये वेगवेगळे धान्य एकत्र करून त्याच पीठ बनवले जाते. पण कुठली धान्य एकत्र करून मल्टी ग्रेन आटा बनवायचा याचे एक शास्त्र आहे.चला तर आपण पाहुयात Multigrain Atta  या लेखात Multigrain Atta कस बनवायचं आणि ते आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे.

 

9 किंवा 10 धान्ये एकत्र करून आज काल अनेक जण मल्टीग्रेन आटा बनवण्याचा सल्ला देतात. पण त्यामध्ये विरुद्ध गुणधर्माची पचायला जड , काही हलकी अशी धान्य एकत्र केली जातात.
उदाहरणार्थ गहू सोयाबीन आणि हरभरा या पचायला जड असलेल्या धान्यांबरोबर ज्वारी ,बाजरी ,नाचणी अशी पचायला हलकी धान्य मिक्स करून मल्टीग्रेन आटा बनवला जातो ,तो योग्य नाही . तसेच ओटस किंवा कुठलेही सीड्स घालण्याची यात गरज नाही. जे आपल्या परिसरात उगवते तेच आपल्याला पचते. त्यामुळे अस्सल भारतीय धान्य तेही आयुर्वेदानुसार योग्य मिश्रण करून वापरलीत , तर त्याचा खूप फायदा होतो.

शरीरात लघुता म्हणजे हलकेपणा करायचा असेल ,मेद आणि कफ कमी करायचा असेल तर लघुगुणाचीच धान्य एकत्र करावी .

आता आपण पाहूयात मल्टीग्रेन भाजणी ज्याचा रोजच्या आहारात समावेश केला तर असंख्य फायदे होतात ,हे अगदी नक्की.
विशेषतः हे मल्टीग्रेन पीठ शरीरातील जडपणा मेद , कफ कमी करतात त्यामुळे स्थूल्य, मधुमेह, पीसीओडी अशा रुग्णांसाठी हे मिश्रण फार उपयुक्त आहे . भविष्यात असे आजार होऊ नयेत, म्हणून ही या पिठाचा समावेश आपण दैनंदिन आहारात करू शकतो.

या भाजणी मध्ये कोणकोणते धान्य घ्यायची तर नाचणी ,ज्वारी ,बाजरी आणि राजगिरा यांचे प्रमाण आणी आहारात कशाप्रकारे समावेश करायचा हे पाहण्याआधी , आपण यांचे गुण पाहूया.

ज्वारी :  ज्वारी ही किंचित मधुर ,तुरट चवीची गुणाने थंड ,उष्ण आणि लघु आहे ही रक्त, कफ आणि पित्तविकारांचा नाश करते.

बाजरी : बाजरी ही ज्वारीपेक्षा पचायला थोडी जड पण गव्हापेक्षा थोडी हलकी आहे . शरीरात जाऊन रुक्षता निर्माण करणारी आहे. याचा गुण उष्ण असल्यामुळे आपण थंडीत बाजरीच सेवन करतो. उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा ज्यांना आम्लपित्त, मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी बाजरी जपून खावी ज्यांना असा त्रास आहे त्यांनी या मल्टिग्रेन पिठामध्ये बाजरीचे प्रमाण कमी करायला हवं किंवा टाळावे.

नाचणी/ रागी : नाचणी सुद्धा पचायला खूप हलकी आहे. बऱ्याच जणांचा असा समज आहे की नाचणी उष्ण आहे . पण तसे नाही ही अनुष्क म्हणजे खूप गरम नाही खूप थंड नाही अशी मध्यम गुणांची आणि फार गुणकारी आहे.

राजगिरा : हे धान्य मधुर, स्निग्ध, बलदायक आणि तिन्ही दोषांचा नाश करणारे आहे संधी, अस्थी तसे बल वाढवणारे आहे.

ही चार धान्य कोणत्या प्रमाणात घ्यायची ते पाहूया

“ज्वारी अर्धा किलो, राजगिरा अर्धा किलो ,नाचणी अर्धा किलो आणि बाजरी पाव किलो”

हे मिश्रण अजून पौष्टिक बनवण्यासाठी आपण त्यावर प्रक्रिया करू शकतो तर ही धान्य वेगवेगळी मंद आचेवर भाजून घ्यायची . कोणतेही धान्य भाजून घेतल्यामुळे त्याचे पचन आणखी सोपे होते आणि त्याला खमंगपणा येतो. भाजलेली ही सगळी धान्ये एकत्र करून ती दळून आणावीत आणि या पिठाची भाकरी ,धिरडे ,थालीपीठ ,डोसे असे असंख्य प्रकार आपण करू शकतो.
ह्या पिठापासून बनवलेले पदार्थ गरमच खावेत आणि त्यासोबत तूप न चुकता खावे . त्या मुले हे पदार्थ अति रुक्ष होणार नाहीत . हे पदार्थ सावकाश चावून खावेत. आणि त्या मध्ये तुपाचा अंतर्भाव करावा म्हणजे पोट फुगणे ,गॅसेस अशा तक्रारी होणार नाहीत.
याशिवाय हि धान्ये दळताना किंवा त्याचे पदार्थ बनवताना ओवा ,जिरे असे पाचक पदार्थ घातले तर त्याची चव व पोषणमूल्ये दोन्ही प्रकारे फायदा होता.

मल्टीग्रेन भाजणीचे उपयोग:

या भाजणीमुळे भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न मिळते.
या भाजणीमुळे हाडे ,त्वचा तसेच केस यांचे आरोग्य सुधारते
या भाजणीमुळे शरीरात हलकेपणा निर्माण होतो
पीसीओडी, मधुमेह अशा लोकांसाठी हे पीठ म्हणजे अगदी वरदान आहे त्यामुळे शरीरातील आमदोष कमी होतो त्यामुळे पीसीओडीत याचा फायदा होतो तसेच रक्तातील साखर कमी होते.
पचायला हलके असलेले हे मिश्रण हृदयरोगांसाठी खूप हितकारक आहे या पिठामध्ये आपण सालीसहित धान्य घालतो ,त्यामुळे भरपूर फायबर मिळते.
प्रोटीन चा उत्तम सोर्स असल्यामुळे थकवा अशक्तपणा अशा तक्रारी दूर होतात आणि मसल्सचे बल वाढते.
ज्यांना आम्लपित्त आहे त्यांनी देखील या पिठाचा वापर आहारात नक्की करून पहा. या मिश्रणामुळे शरीरातील कफ आणि पित्त कमी होते त्यामुळे आम्लपित्त असणाऱ्या लोकांना याचा फायदा होतो.
लहान मुले ,वृद्ध व्यक्ती किंवा गरोदर स्त्रिया यांना या पिठाचे धिरडे किंवा डोसा करून दिला तर त्यांच्या आहारातील पोषण वाढवता येते.

अवश्य वाचा :  WEIGHT LOSS TIPS IN MARATHI | वजन कमी करण्यासाठी करा हे नऊ सोपे उपाय

Leave a Comment